पुणे : पुण्यातील वनभवन येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मामा-भाचे कधी आमच्या पक्षात येतील माहिती का नाही, हे माहिती नाही. त्यांनीदेखील तसे काही सांगितले नाही, असेदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. तरीही बाळासाहेब थोरात आमच्या पक्षात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करू, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
विरोधाला विरोध करून काहीही होत नाही :गेल्या काही दिवसांपासून बारामती मतदारसंघाला भाजपकडून टार्गेट केला जात आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर काम जरूरी असते. बारामतीच्या कार्यकर्त्यांना तेच सांगितल आहे की, बारामती जे चांगल आहे त्याचे अनुकरण केलेच पाहिजे, असेदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच, आज मी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांना हे सांगितले की, काम केल्याने जनतेसमोर जाता येते आणि वर्षभर काम केले तर मतदानाच्या दिवशी लोकं त्याचा विचार करीत असतात विरोधाला विरोध करून काहीही होत नाही आणि हेच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकवले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला फटका :नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला फटका बसला आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, विधान परिषदमध्ये पराभव झाला. त्याचे विश्लेषण करीत आहे. कुठे चुकले त्याच विश्लेषण करू. नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता आहे. तसेच, आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आम्ही विजयी होऊ कारण ससा एखाद्या वेळेस थांबला याचा अर्थ कासवाचा वेग वाढला असा होत नाही. असेदेखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
कसबा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार :कसबा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भाजपचे इच्छुक उमेदवार बिडकर आणि धीरज घाटे हे नाराज असल्याचे सांगितले जातं आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कसब्यात कोणीही नाराज नाही. मी धीरज घाटे आणि गणेश बीडकर यांच्याशी बोललो आहे. ते कामालादेखील लागले आहेत. उद्या माझ्या उपस्थितीत प्रचार नारळ फोडला जाणार आणि आम्ही कसबा आणि चिंचवड दोन्ही पोटनिवडणूक विक्रमी मताने जिंकू, असा विश्वासदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.