बारामती (पुणे) - बारामती शहरातील नागरिकांना रेशनवरील धान्य निकृष्ट दर्जाचे दिले जात आहे. गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे आढळत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दिवाळी सणासाठी तरी चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करावा, अशी अपेक्षा बारामती शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बारामतीत रेशनवर निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप, नागरिकांमध्ये नाराजी - baramati bad quality ration food grains news
बारामती शहरातील नागरिकांना रेशनवरील धान्य निकृष्ट दर्जाचे दिले जात आहे. या धान्यात मोठ्या प्रमाणात खडे आणि कचरा आढळला आहे. सणासुदीच्या दिवसात गहू खावे की खडे, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर चांगल्या धान्याची मागणी
अनेकवेळा रेशनचे धान्य कमी दर्जाचे मिळते. मात्र बारामती शहरात मिळणाऱ्या रेशनच्या धान्यात मोठ्या प्रमाणात खडे आणि कचरा आढळला आहे. सणासुदीच्या दिवसात गहू खावे की खडे, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी रेशनिंगच्या अन्न धान्यावर अवलंबून राहावे लागते. अनेकदा मागणीनुसार पुरवठा होत नाही किंवा उपलब्ध धान्य कमी प्रतीचे येते. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर चांगल्या प्रतीचे धान्य नागरिकांना मिळेल, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा गोरगरीब नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या मनात नाराजी
बारामती शहरातील काही रेशन दुकानदारांकडून नागरिकांना दोन महिन्यांचा एकत्रित धान्य पुरवठा केला जात आहे. यामध्ये गहू, तांदूळ व डाळ दिली जात आहे. मात्र काही रेशन दुकानदारांकडून एकाच महिन्याचे धान्य दिले जात असून डाळीचा पुरवठा केला जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. रेशनच्या धान्यात कचरा किंवा खडे आढळल्यास नागरिकांनी ते धान्य न घेता दुकानदाराकडून बदलून घ्यावे, दुकानदार बदलून देत नसेल तर तशी तक्रार द्यावी, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रेशन दुकानदारांना सूचना
बारामतीतील सर्व धान्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना चांगल्या प्रतीचे धान्य वाटप करण्याच्या तसेच खराब धान्य बाजूला ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खराब धान्य असल्यास दुकानदार बदलून देत नसेल तर संबंधित दुकानदाराची तक्रार करावी, असेही सांगण्यात आले आहे.