पुणे : कोरोनाच्या दहशतीमुळे रक्ताचे नातेदेखील अंतर राखत असल्याचे चित्र कोरोना काळात पुढे येऊ लागले आहे. अगदी नात्यातल्या व्यक्तीनेही जवळ न घेतल्याचा घटना राज्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. मात्र, पुण्यातील एक घटना याला अपवाद ठरला आहे. सायकलिंगसाठी निघालेल्या नीरज दीक्षित या तरुणानेकॅनलमध्ये वाहत असलेल्या एका महिलेचे प्राण वाचवून कोरोनाकाळातही माणुसकी जपली आहे.
एखादी घटना घडत असताना तिथे बघ्यांची गर्दी जास्त असते. काहीजण आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात त्या घटनेचे चित्रीकरण करण्यातच रमतात. मात्र, एखादाच मदतीसाठी पुढे येतो. असाच मदतीचा हात पुण्यातील नारायणपेठ येथे राहणाऱ्या नीरज दीक्षित याने पुढे केला आहे. फुरसुंगी येथील कॅनलमध्ये वाहून जात असलेल्या एका महिलेचा जीव त्याने वाचवला आहे. नीरज हा आपल्या मित्रांबरोबर लोणी काळभोर येथे सायकलिंगला गेला होता. परत येताना फुरसुंगी येथील कॅनॉलजवळ गर्दी जमलेली त्याने व त्याच्या मित्रांनीपाहिली. त्या कॅनलमध्ये एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून चालली होती. तिच्या मुली आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागत होत्या. परंतु, तिथे कोणीच मदत करायला तयार नव्हते. मात्र, नीरजने त्याच्या काही मित्रांसह त्या महिलेला पाण्याबाहेर काढले आणि रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयामध्ये नेण्याची व्यवस्था सुद्धा केली.