पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे बंद करण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे दोन्ही महापालिकेच्या हद्दी सील करण्यात आल्या आहेत. तर, पुढील सात दिवस दोन्ही शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
कोरोना इफेक्ट : पुढील ७ दिवसांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे सील - लॉकडाऊन पिंपरी चिंचवड
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रविवार मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे बंद राहणार आहे. तर, पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 उघडी राहणार आहेत.
देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. प्रशासन याला आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहेत. महाराष्ट्र सरकारने 17 एप्रिल रोजी जो आदेश जारी केला, त्यात करोनाचा उद्रेक झालेल्या भागात कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. या अधिकाराअंतर्गंत आयुक्तांनी रविवारी रात्री ही नवीन उपाययोजना जारी केली. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 पर्यंत उघडी राहणार आहेत. तर, पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांचा आकडा 500 च्या पार गेला आहे. पुणे शहरात रविवारी दिवसभरात 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आत्तापर्यंत 586 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पिंपरी चिंचवड शहराची आकडेवारी 59 वर पोहोचली आहे.