महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे स्मशानभूमी यंत्रणांवर ताण - Corona Death Statistics Pune

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दाहकता भीषण आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडत आहे. आणि दररोज मृत्यूचे आकडे वाढतच आहेत.

Cemetery System Review Pune
कोरोना मृत्यू अंत्यसंस्कार ताण पुणे

By

Published : Apr 15, 2021, 5:20 PM IST

पुणे -पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दाहकता भीषण आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडत आहे. आणि दररोज मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची काय व्यवस्था आहे, याचा आढावा 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतला.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

एका महिन्यात 950 मृत्यू

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली, तर कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे दिसून येते. गेल्या आठवडाभरात शहरात दररोज सरासरी 60 मृत्यू झाले आहेत. शहरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची गेल्या सहा दिवसांतील आकडेवारी खालील प्रमाणे,

14 एप्रिल - 66 रुग्णांचा मृत्यू
13 एप्रिल - 73 मृत्यू
12 एप्रिल - 65 मृत्यू
11 एप्रिल - 58 मृत्यू
10 एप्रिल - 61 मृत्यू
9 एप्रिल - 51 मृत्यू

गेल्या महिनाभरात कोरोनामुळे शहरात 950 मृत्यू

गेल्या एका महिन्यात पुणे शहरात तब्बल 950 मृत्यू हे कोरोनामुळे झाले आहेत. 14 एप्रिलला 66 रुग्णांचा मृत्यू, तर आता पर्यंत
एकूण 5 हजार 902 मृत्यू झाले आहेत. हाच आकडा 14 मार्चला 4 हजार 952 इतका होता. म्हणजे गेल्या महिनाभरात शहरात 950 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.

हेही वाचा -पुण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना पाच जणांना अटक, 4 इंजेक्शन जप्त

डिसेंबर ते जानेवारी या एका महिन्यात 150 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर जानेवारी ते फेब्रुवारी या एका महिन्यात 106 मृत्यू आणि फेब्रुवारी ते मार्च या एका महिन्यात
153 रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकंदरीतच या आकडेवारीवरून गेल्या महिन्याभरात मृत्यूचा आकडा किती वाढला हे लक्षात येते.

14 एप्रिल - 5902 मृत्यू

14 मार्च - 4952 मृत्यू

14 फेब्रुवारी - 4799 मृत्यू

14 जानेवारी - 4693 मृत्यू

14 डिसेंबर - 4543 मृत्यू

जिल्ह्यात एका महिन्यात 1 हजार 576 मृत्यू

दुसरीकडे पुणे जिल्ह्याचा विचार केला तर, पुणे जिल्ह्यात 14 एप्रिल पर्यंत 10 हजार 989 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूचा हाच आकडा एक महिन्यापूर्वी 14 मार्चला 9 हजार 413 इतका होता. म्हणजे गेल्या महिन्याभरातच पुणे जिल्ह्यात 1 हजार 576 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अत्यसंस्काराचा ताण

पुणे शहरात दररोज कोरोनाचे 60 रुग्ण मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी यंत्रणांवर ताण पडत आहे. पुण्यातील सर्वात मोठी स्मशानभूमी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे, सध्या कैलास स्मशानभूमी, औंध, कोरेगाव पार्क, तसेच कात्रज येथील स्मशानभूमीमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

विद्युत दाहिनीला प्राधान्य

कैलास स्मशानभूमीमध्ये दोन विद्युत दाहिन्या आहेत, तर अग्नी संस्कार करण्यासाठी 10 दाहिन्या आहेत. मात्र, अनेकदा लाकडाच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करण्याचे नागरिक टाळतात आणि विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला जातो. या ठिकाणी एका मृतदेहाचे सर्व सोपस्कार पूर्ण व्हायला साधारण 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने विद्युत दाहिनीसाठी मृतदेह वेटींगवर राहात असल्याचे चित्र पहायला मिळते. सध्या शहरात खासगी, तसेच शासकीय मिळून एकूण 101 रुग्णवाहिका आहेत. यातल्या 23 रुग्णवाहिका या पुणे शहरातल्या कोरोनाबाधितांचे शव नेण्यासाठी शववाहिका म्हणून वापरल्या जात आहेत. तसेच, कोरोना रुग्णाचा घरी मृत्यू झाला, तर नातेवाईकांना चार पीपीई किट, मृतदेह ठेवण्यासाठी पिशवी आणि रुग्णवाहिका महापालिकेकडून पुरवली जाते. एकंदरीतच शहरात वाढत्या मृत्यूंमुळे स्मशानभूमी यंत्रणेवर ताण येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा -बारामतीत संचारबंदीला चांगला प्रतिसाद, पोलिसांचा चोख बंदोबस्त

ABOUT THE AUTHOR

...view details