पुणे : भारताच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना स्फूर्ती आणि जोष मिळावा, त्यांच्या शौर्यात वाढ व्हावी या उद्देशाने काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत, यासाठी पुणेकर संस्थेने पुढाकार घेत छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधण्याचे ठरवले आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे, त्यागाचे, बलिदानाचे महान प्रतीक आहे. ज्यांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी स्थान दिले.
दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपतींचा पुतळा :महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवराय हे सीमेवरील जवानांसाठी आदर्श :देशाच्यासीमेवर आपले रक्षण करणाऱ्या जवानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. परंतु, त्यांच्यासाठी काही करण्याकरिता मोजक्याच संस्था पुढे येतात. हेच मोठे काम पुण्याच्या संस्थेने करण्याचे ठरवले आहे. जवानांमध्ये स्फूर्ती आणि देशभक्तीपर नीतीमूल्याचे रोज दर्शन घडण्याकरिता शिवरायांचा पुतळा निश्चित आदर्श ठरणार आहे. छत्रपती शिवराय हे कायमच देशभक्ती, त्याग, समर्पणाचे प्रतीक राहिले आहेत. त्यांची युद्धनीती, पराक्रम, देशहिताची धोरणे सीमेवरील जवानांसाठी आदर्श ठरणार आहेत.