पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केलीय. त्यामुळं लवकर मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. तर, दुसरीकडं आज राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक झाली. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष तसंच सदस्य देखील उपस्थित होते. आयोगाची पुढील बैठक 4 तारखेला होणार आहे. त्यावेळी सर्वेक्षण चाचणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून, आजच्या बैठकीत अंतिम निकषांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आयोगाची दुसरी बैठक :मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला आहे. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला जबाबदारी दिलीय. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुण्यात काही बैठका झाल्या. या बैठकीत मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विविध विषयावर चर्चा करण्यात आलीय. मात्र, अंतर्गत मतभेदामुळं मागासर्वग आयोगाच्या काही सदस्यांनी राजीनामा दिला होता. तसंच आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी देखील आयोगाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारनं माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची निवड मागासवर्ग आयोगावर केली होती. नवीन अध्यक्ष तसंच नवीन सदस्यांबरोबर आयोगाची पहिली बैठक नागपूरमध्ये झाली होती. यानंतर आयोगाची दुसरी बैठक आज पुण्यात पार पडलीय.