महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी चिंचवडच्या चार रुग्णालयात उभारण्यात येणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट - पिंपरी चिंचवड महानगरपालिका

महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी ९६० एलपीएम व थेरगाव रुग्णालयात १०५० एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास ४५० ऑक्सिजन बेड व ५० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी हा प्लांट उपयुक्त ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका रूग्णालय
पिंपरी चिंचवड महानगरपालिका रूग्णालय

By

Published : Apr 27, 2021, 10:39 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) - कोरोना काळात देशाच्या बर्‍याच भागात लोकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमावावा लागत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनची गरज ओळखून आतापर्यंत जवळपास तीनशे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनाच्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट बसविण्यात येणार आहे.

महापालिकेचा निर्णय

पिंपरी चिंचवड शहरातील ऑक्सिजनची कमतरता व भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेवून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून देखील भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. ऑक्सिजन प्लांट निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे ऑक्सिजन प्लांटची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने पुढे अधिक कमतरता पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने तातडीने ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

इतक्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था

सद्यस्थितीमध्ये शहरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची धावपळ होत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे राज्यात अनेक दुर्घटना घडतांना दिसून येत आहे. भविष्यामध्ये शहरात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी ९६० एलपीएम व थेरगाव रुग्णालयात १०५० एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास ४५० ऑक्सिजन बेड व ५० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी हा प्लांट उपयुक्त ठरणार आहे.

..तर ऑक्सिजन पुरवठ्यात विलंब

ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांकडे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने या कंपन्यांकडून शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करून भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविल्यामुळे ऑक्सिजन कायमचा प्रश्न मिटणार असून यामुळे मोठया प्रमाणात बचत होणार आहे, अशी माहिती सत्तापक्ष नेता नामदेव ढाके यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details