जुन्नर (पुणे) - शेतात काबाडकष्ट करुनही कांद्याला बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकरी आता चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा घेऊन हिवाळी हंगामातील कांदा लागवडीला लागला आहे.
हिवाळी हंगामातील कांद्याची लागवड सुरू योग्य बाजारभावाची खोटी आशा
चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पसरलेली रोगराई यामुळे कांद्याचे दोन हंगाम वाया गेले. यामध्ये शेतकऱयांच्या मेहनतीसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतात काबाडकष्ट करुनही इतर शेतमालासह कांद्याला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या भांडवली पिकांच्या लागवडीकडे पाठ फिरवत आहे. यंदा हिवाळी हंगामात कांद्याची लागवड करुन कांद्याची साठवणूक करुन योग्य बाजारभावाची खोटी आशा घेऊन वाट पाहणार असल्याचे शेतकरी सांगतात.
हिवाळी कांद्याची लागवड
जुन्नर तालुक्यात हिवाळी हंगामात पुणे फुरसुंगी या जातीच्या रोपांची लागवड करत आहेत. ही बियाणे पाच हजार रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकत घेऊन टाकतात. जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील शेतकरी अनिल बोडके यांनी यंदा पाच एकर शेतात पुणे फुरसुंगी जातीच्या कांद्याची लागवड सुरू केली आहे. हा कांदा थंड वातावरणात चांगले उत्पादन देतो आणि साठवणुकीतही टिकून राहतो. त्यामुळे यंदा हिवाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
कांद्याला हमीभावाची गरज
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱयांचे कांदा पिकावर कुटुंबाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मोठ्या भांडवली खर्चातून कांद्याची लागवड केली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून कांद्याचे पडलेले बाजारभाव व साठवणुकीच्या कांद्याचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या शेतमालाला हमीभाव देऊन शेतकऱयांचे कोलमडलेले आर्थिक गणित पुन्हा जुळवण्याची गरज आहे.