पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, रुग्णालयाने घेतले वाढीव आयसीयू चार्जेस - पिंपरी चिंचवड स्टार हॉस्पिटल कोरोनाबाधित मृत जास्त बिल आकारणी बातमी
24 ऑगस्ट पर्यंत मुमताज यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच रात्री दहाच्या सुमारास कोरोनाग्रस्त मुमताज यांची प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसे डॉ. अमित वाघ यांनी अधिकृतरित्या सही असलेले मेडिकल सर्टिफिकेट दिले.
पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातीलखासगी रुग्णालय स्टार हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित मृत महिलेचा दफनविधी झाल्यानंतर देखील रुग्णालय प्रशासनाने अधिक एका दिवसाचे आयसीयू चार्जेस लावल्याचा आरोप नातेवाईकांनी रुग्णालयावर केला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित वाघ यांच्यासह कॅशिअरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. अमित वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केली.
मुस्तफा अब्दुलगफार तांबोळी (वय- 19 रा. चिखली) असे तक्रार दिलेल्या तरुणाचे नाव असून मुस्तफा यांची आई मुमताज अब्दुलगफार तांबोळी (वय- 38) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. हे सर्व प्रकरण ऑगस्ट महिन्यातील असून निगडी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा यांनी आई मुमताज यांना ऑगस्ट महिन्याच्या 19 तारखेला कोरोनाची लक्षणे असल्याने आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू झाले. तेव्हा, रुग्णालयात 42 हजार 800 रुपये तपासणी चार्जेस म्हणून मुस्तफा यांनी भरले होते. पुढील पाच दिवस म्हणजे 24 ऑगस्ट पर्यंत मुमताज यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्याच रात्री दहाच्या सुमारास कोरोनाग्रस्त मुमताज यांची प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसे डॉ. अमित वाघ यांनी अधिकृतरित्या सही असलेले मेडिकल सर्टिफिकेट दिले. त्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी तक्रारदार मुस्तफा यांच्या नातेवाईकांनी 25 ऑगस्टला उपचाराचे 85 हजार रुपये असे एकूण 1 लाख 27 हजार 800 रुपये बिल भरून मुमताज यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु, तक्रारदार मुस्तफा यांनी बिल पाहत असताना संबंधित रुग्णालयाने मुमताज यांचा 24 ला मृत्यू झाला असताना 25 ऑगस्टचे आयसीयूचे 9 हजार अधिक चार्जेस लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार डॉ. अमित वाघ आणि कॅशिअर यांनी अधिकचे पैसे घेऊन फसवणूक केली असल्याचा गुन्हा निगडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड हे करत आहेत.