बारामती -बारामती एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या अशोक जंगले यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसर्गामुळे एसटी बससेवा अद्याप सुरळीत झाली नाही. त्यामुळे जंगले यांना महिन्यातून आठच दिवस कामावर बोलवले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करण्याची वेळ आली आहे.
अशोक मोतीराम जंगले हे मागील दहा वर्षांपासून बारामती एसटी आगारात चालक म्हणून काम करत आहेत. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील पोकळी गावचे रहिवासी आहेत. मात्र नोकरीनिमित्त ते गेली दहा वर्षांपासून बारामतीत वास्तव्य करीत आहेत. अशोक जंगले हे एसटीत कायमस्वरूपी सेवेत आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतांश एसटी बसेस बंद आहेत. त्यामुळे त्यांना महिन्यातील केवळ आठच दिवस काम असते. या कामातून रोज साडेतीनशे रुपये मिळतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आराधना, आदेश व संदेश ही दोन मुले आहेत. चार माणसांचे कुटुंब सांभाळणे सध्या एसटीच्या पगारात परवडत नाही, म्हणून जेव्हा काम नसेल त्यादिवशी जंगले हे बिगारी काम करतात. या बिगारी कामातून त्यांना चारशे रुपये हजेरी मिळते. कुटुंब जगवण्यासाठी बिगारी काम करण्याची वेळ आल्याचे ते सांगतात.
वयस्कर आई-वडिलांना पाठवले गावी
या पगारात परवडत नसल्याने वयस्कर आई-वडिलांना गावाकडे पाठवले आहे. आम्ही एसटी क्वार्टरसमध्ये राहायला होतो. तेव्हा पगारातून पैसे कट व्हायचे. मात्र आता क्वार्टरदेखील खाली करायला लावल्याने, नवीन घर पाहण्यासाठी प्रचंड त्रास झाला. घरभाडे देखील दुप्पट द्यावे लागत आहे, अशी व्यथा जंगले यांनी मांडली.