पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक ०२ मार्च २०२३ ते शनिवार, दिनांक २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी एकूण १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८.४४.१९६ विद्यार्थी ७,३३,०६७ विद्यार्थीनी आहेत. एकूण २३,०१० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.
बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड :मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली आहे. सरल डेटावरुन माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी दिनांक ०१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.
हेल्पलाईन सुविधा उपलब्ध : मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेचे वेळापत्रक दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. तसेच जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय व मंडळामध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच स्तरावर राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.