पुणे - कृष्ण गरूड सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावरच्या सदाहरित जंगल उतारांवर दिसतो. पिवळी चोच आणि पाय याखेरीज या गरुडाची पिसे काळी असतात. झाडांलगत तरंगत पक्षी, साप, खारी अशी भक्ष्ये शोधताना दिसतो. भिमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, आंबोली या दाट जंगलांवर काळ्या रंगामुळे आणि घुटमळत तरंगण्याच्या सवयीमुळे सहज ओळखता येतो. पावसाळ्यात ढगांमुळे त्याला भक्ष्य दिसत नसल्याने कमी पावसाच्या डोंगरांवरही दिसतो. यंदा साकारलेला 'कृष्ण गरूड' किंवा 'ब्लॅक ईगल' हा सुमारे ८० फूट (रुंद) लांब आहे.
श्रीकांत इंगळहळीकर यांनी ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून भातशेतीवर साकारला 'कृष्ण गरूड'; पाहा व्हिडिओ - पॅडी आर्टच्या माध्यमातून भातशेतीवर कृष्ण गरूड
निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात मात्र त्यांचेच चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर चितारण्याचा अनोखा प्रयोग हौशी वनस्पतीतज्ञ श्रीकांत इंगळहळीकर हे सन २०१६ पासून करत आहेत. यंदा सातव्या वर्षी त्यांनी ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारण्याच्या शैलीत 'कृष्ण गरूड' किंवा 'ब्लॅक ईगल' ही चित्रकृती सादर केली आहे. भरारी घेतलेल्या गरुडाचे हे चित्र हिरव्या काळ्या भातरोपांच्या लावणीतून तयार केले आहे. या पूर्वीच्या वर्षी गणपती, काळा बिबट्या, पाचू कवडा, चापडा साप, गवा, क्लोराॅप्सिस अशी चित्रे सादर करण्यात आली होती.
![श्रीकांत इंगळहळीकर यांनी ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून भातशेतीवर साकारला 'कृष्ण गरूड'; पाहा व्हिडिओ निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16414607-302-16414607-1663594980869.jpg)
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील पानाफुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे. सदर कलाकृती ही सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाच्या थोडे अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपा जवळील लेक्सॉन वाइंडर्स येथे बघायला मिळू शकते. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका 'कॅन्व्हास'सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले आहे.
‘पॅडी आर्ट’ या कलेविषयी - दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतक-यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो अटा’ ही कला १९९३ मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली.