पुणे - अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असणारा आणि विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर हे एक गणपतीचे जागृत स्थान आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस स्थित जुन्नर तालुक्यात विघ्नेश्वराचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर पूर्वाभिमूख असून त्याला मोठी दगडी तटबंदी आहे. एखाद्या भूईकोट किल्ल्याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. कळस आणि शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत.
सर्वात श्रीमंत अष्टविनायक...ओझरचा विघ्नेश्वर! - ganesh temples in pune
अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असणारा आणि विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर हे एक गणपतीचे जागृत स्थान आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस स्थित जुन्नर तालुक्यात विघ्नेश्वराचे मंदिर स्थित आहे. विघ्नेश्वराची अख्यायिका, त्याचा इतिहास आणि माहिती जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्ट मधून...
महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदराची मूर्ती आहे.
देवळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर गाभारा आहे. गाभा-यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर आणि बेंबीत हिरे आहेत. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही मूर्ती स्वयंभू आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पिताळ्याच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि.मी. अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे. मुघलांच्या सततच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी या मंदिरोभोवती मोठी तटबंदी बांधण्यात आली. काळ्या पाषाणातील या तटबंदीत चुना आणि वेतळलेले शिसे ओतण्यात आले आहे. मुख्य द्वारातून प्रवेश करताना किल्ल्यात प्रवेश केल्याचा भास होतो. भक्कम लाकडी दरवाजे आणि लोखंडाच्या साखळ्या या ठिकाणी दिसतात. जुन्या बिजागऱ्या अजूनही सुस्थितीत असून दरवाजांना आधार देत आहेत.