महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीवाची बाजी लावून बारामतीचे 12 कोरोना योद्धे मृतांवर करताहेत अंत्यसंस्कार - पुणे जिल्हा बातमी

कोरोनाची समाज मनावर एवढी भीती निर्माण झाली आहे की, कुटुंबातील आपली प्रिय व्यक्ती कोरोनामुळे गेली असता त्या मृत देहाला स्पर्श करणेही टाळले जात आहे. अशावेळी आपला जीव धोक्यात घालून तो पंचतत्वात विलीन करण्याचे कार्य बारामतीतील तरुण करत आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा...

विशेष बातमी
विशेष बातमी

By

Published : Apr 25, 2021, 10:54 PM IST

बारामती (पुणे)- समाजातील एखादी व्यक्ती जेव्हा या जगाचा निरोप घेते तेव्हा त्या व्यक्तीच्या कुटुंबासह समाजातील शेकडो लोक त्या मृत व्यक्तिवर अंत्यसंस्कार करताना आजवर आपण बघत आलो आहोत. मात्र, जगभर कोरोनाने घातलेल्या आकांड तांडवामुळे अवघी परिस्थितीच बदलून गेली. कोरोनाची समाज मनावर एवढी भीती निर्माण झाली आहे की, कुटुंबातील आपली प्रिय व्यक्ती कोरोनामुळे गेली असता त्या मृत देहाला स्पर्श करणेही टाळले जात आहे. अशावेळी आपला जीव धोक्यात घालून तो पंचतत्वात विलीन करण्याचे कार्य बारामतीतील तरुण करत आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा...

आढावा घेताना प्रतिनिधी

बारामती नगरपालिकेच्या आरोग्य व उद्यान विभागातील 12 योद्ध्यांनी मागील वर्षभरापासून आजपर्यंत 570 हून अधिक कोरोना संक्रमित रूग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे अंत्यसंस्कार करत असताना मृत व्यक्तीच्या जाती-धर्माच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार केले जात आहे. विजय शितोळे, मज्जित पठाण, सलीम शेख, पंकज पवार, राजेश लोहार, विनोद क्षीरसागर, राजू पवार, राजन खोमणे, अजय खरात, नितीन शिंदे, चेतन चव्हाण, गणेश दोडके हे कोरोना युद्धे माणुसकीचा धर्म जपत बारामतीत अंत्यसंस्काराचे कार्य करत आहे.

जात धर्म नव्हे तर माणुसकीच सर्वश्रेष्ठ

आयुष्यभर जात धर्म मानणारा माणूस जेव्हा जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याच्या अंतिम प्रवासाला कोणताही धर्म किंवा जात महत्त्वाचे नसते. तर माणुसकीच महत्त्वाची असते याचा प्रत्यय बारामतीसह आज विविध ठिकाणी अनुभवास येत आहे. बारामतीतील या 12 कोरोना योद्ध्यांनी आतापर्यंत विविध जाती धर्मातील मृतदेहांवर त्या त्या जाती धर्मानुसार अंत्यसंस्कार केले आहेत. दुर्दैवाने अद्यापही करत आहेत. आतापर्यंत मुस्लीम समाजाचे 25, ख्रिश्चन धर्माचे 10, वाणी समाजाचे 10 व इतर मृतदेहांचे प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले आहेत. यामध्ये बारामतीसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, पुरंदर तसेच सोलापूर, सातारा, फलटण, नगर जिल्ह्यातील मृतांचा समावेश आहे.

24 तास बजावतात कर्तव्य

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. पुण्यापाठोपाठ बारामतीतही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. बारामतीत मागील वर्षीच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम रात्रंदिवस या कोरोना योद्ध्यांकडून केले जात आहे. अनेकदा एकाच वेळी दहापेक्षा अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. अशा वेळी या योद्ध्यांना आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे ते सांगतात.

हेही वाचा -पुणे : खेडमधील द्वारका वृद्धाश्रम लसीकरणापासून वंचित

ABOUT THE AUTHOR

...view details