बारामती (पुणे)- बारामतीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे येथील उपबाजारात चिंचेचा सर्वात मोठा बाजार भरतो. पुणे जिल्ह्यातील चिंचेची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सुपे बाजाराकडे पाहिले जाते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचेचा हंगाम पूर्ण वाया गेला होता. मात्र, चालू हंगामात चिंचेची मोठी आवक होत आहे. आजच्या बाजारात तब्बल 10 हजारांहून अधिक पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे. सध्या अखंड चिंचेचा दर 2 हजार ते 4 हजार रुपये तर फोडलेल्या चिंचेचा दर 6 हजार 800 ते 9 हजार 190 रुपये, चिंचोकाचा दर 1 हजार 530 तर 1 हजार 600 इतका आहे.
मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदीमुळे गतवर्षीचा चिंचेचा हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या नैराश्य होते. मात्र, चिंचेला चांगला दर असून आवकही वाढत आहे. चिंचेचा हा चालू हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली..
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील व्यापाऱ्यांकडून होतेय खरेदी
येथील बाजारात बारामतीसह इंदापूर, शिरूर, पुरंदर, हवेली, दौंड, भोर, मावळ, सोलापूर, फलटण, लोणंद, सातारा आदी भागातील शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतात. तर लातूर, तुळजापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बार्शीसह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदीसाठी येतात. गतवर्षी टाळेबंदीमुळे वाहतूक बंद असल्याने तसेच वेळोवेळी बाजार बंद राहिल्याने खरेदी-विक्री तेवढ्या प्रमाणात होऊ शकली नाही. शिवाय बाजारपेठ व मालाला उठाव नसल्याने चिंचेचा भाव पन्नास टक्क्यांनी घटला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह बाजार समितीला ही मोठा आर्थिक फटका बसला होता.
मागील वर्षीच्या तुलनेत वाढती उलाढाल
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे बाजारात सन 2019 ला चिंचेच्या खरेदी विक्रीतून तब्बल सहा कोटींची उलाढाल झाली होती. मात्र, गत वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच अवकाळी पावसामुळे चिंचेची आवक घटल्याने 2019 च्या तुलनेत 3.75 कोटी रुपयांची तफावत होती. यंदा बाजार सुरू असल्याने व आवक वाढत असल्याने मे अखेर सुरू राहणाऱ्या या बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. बाजार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 24 हजार 209 पोत्यांची आवक झाली असून सुमारे 3 कोटींची उलाढाल आतापर्यंत झाली आहे.
आंध्रप्रदेश तेलंगणामधून चिंचेला अधिक मागणी