पुणे - जुन्नर मधील उंब्रज येथील कंन्टेमेंट झोनमध्ये पोलीस व शिंगोटे कुटुंबात झालेल्या वादातून पतीसह पत्नीने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून पती रोहिदास यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी उपअधीक्षकांमार्फत चौकशी समिती नेमली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शिंगोटे कुटुंबीय आत्महत्या प्रकरणात विशेष समितीचे गठन; दोषींवर कठोर कारवाईचे अधीक्षकांचे आदेश उंब्रज नं-1 गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव कंन्टेमेंट झोनमध्ये आहे. याच ठिकाणी शिंगोटे कुटुंब भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते.
काल संध्याकाळच्या सुमारास भाजीपाला विक्री करून घरी जात असताना नाकाबंदी केलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस व शिंगोटे कुटुंबात वाद झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र या वादात कोणीही मध्यस्ती केली नाही.
अखेर हा वाद विकोपाला गेला. पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या शिंगोटे पती-पत्नीने विषारी औषध घेतले. यामध्ये पत्नी अनुजाचा उपचाराआधीच मृत्यू झाला असून पती रोहिदास यांच्यावर पुण्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची पुणे ग्रामीण पोलीसांकडून गांभिर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशी समितीत दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले आहे.