पुणे- 'आम्ही सारे कलाकार, झालो बेकार', 'काम बंद, घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद, हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडले आहे, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करत पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने मूकमोर्चा व धरणे आंदोलन केले. 'अनलॉक'च्या प्रक्रियेत सगळेच सुरू होत आहे, मग केवळ इव्हेंट्सवर बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का? असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी केला.
सरकारने लवकरात लवकर जाहीर कार्यक्रमांना परवानगी दिली नाही, तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील, असा इशारा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. पुणे कॅम्प येथील आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा मूकमोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले. जवळपास दीड ते दोन हजार व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते. तर, ५० पेक्षा अधिक विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामध्ये प्रामुख्याने महाकला मंडळ, मंडप ओनर्स वेल्फेअर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड साउंड लाईट असोसिएशन, प्रोफेशनल ऑडिओ अँड लाईट असोसिएशन (पाला), आदी संस्थांचा समावेश आहे.
कोरोनामुळे जवळपास ७ महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झालेले नाहीत. त्यामुळे, या संबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी.जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर, या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या जवळपास चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशांची भ्रांत, थकलेले हप्ते आणि निराशा यामुळे या क्षेत्रातील अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करू लागले आहेत. त्यामुळे, सरकारने याचे गांभीर्य ओळखून इतर व्यवसायांप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी. अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी यांनी केली.