पुणे -लॉकडाऊनमध्ये राज्यातील जिम बंद असल्याने विशिष्ट प्रकारचा व्यायाम आवश्यक असलेल्या रुग्णांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे किमान अशा आजारी माणसांसाठी जिम सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे.
58 वर्षीय शिरीष बोधनी अर्धांग वायूने आजारी आहेत. फिजिओथेरपीचा कोर्स संपल्यांनंतर त्यांना जिममध्ये जाऊन विशिष्ट स्वरुपाचा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, गेल्या 5 महिन्यांपासून त्यांच्या व्यायामात खंड पडला आहे. शहरातील जिम बंद असल्याने त्यांना महापालिकेने उभारलेल्या ओपन जिमचा आधार घ्यावा लागत आहे. असे असले तरी याठिकाणी व्यायाम करण्यात अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सुधारत असलेली प्रकृती पुन्हा खालावत चालली आहे. तेव्हा किमान आजारी व्यक्तींचा विचार करून जिम सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे.