पुणे- पिंपरी चिंचवडमधील स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस भटकी कुत्री खात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. निगडी स्मशानभूमीत हा प्रकार दोन जूनच्या सायंकाळी घडलेला आहे. याचे चित्रीकरण करणारा तरुण दीपक खैरनार याने याबाबतची रीतसर तक्रार देखील केली आहे. त्यानंतर महापालिकेने असे घडले नसल्याचा दावा केला आहे. पण चित्रीकरणातील गांभीर्य पाहून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
धक्कादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्याने खाल्ले मांस
स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस भटकी कुत्री खात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. निगडी स्मशानभूमीत हा प्रकार दोन जूनच्या सायंकाळी घडलेला आहे. चित्रीकरणातील गांभीर्य पाहून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
दीपक खैरनार एका अंत्यविधीसाठी दोन जूनला स्मशानभूमीत गेलेला होता. अंत्यविधी पार पडल्यानंतर तो तिथून घरी निघाला, तेव्हा कुत्र्यांच्या त्याला आवाज आला. म्हणून तो पुन्हा अंत्यविधी पार पडणाऱ्या शेडमध्ये गेला. त्याठिकाणी अनेक भटकी कुत्री होती. काही कुत्री ही एका अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या पायाचे मांस खात असल्याचे आढळले. या धक्कादायक घटनेवर कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून याचे त्याने चित्रीकरण केले. नंतर महापालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली. त्यानुसार पालिकेच्या संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली. पण असे काही घडले नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र चित्रिकरणाचे गांभीर्य पाहून ठेकेदाराला नोटीस दिल्याचे पालिका सांगत आहे.