पुणे - परिचारिका राजश्री कानडे या सलग वीस दिवस ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कर्तव्य बजावत होत्या. बुधवारी त्या घरी आल्या. त्यांच्या सोसायटीतील नागरिकांनी थाळी वाजवून आणि पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. यावेळी शेजाऱ्यांच्या प्रेमाने भारावलेल्या कानडे यांना अश्रू अनावर झाले. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुग्णालयात कर्तव्य बजावून घरी परतलेल्या परिचारिकेचे थाळीनाद अन् पुष्पवर्षाव करून स्वागत - Intensive care unit
रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका अक्षरशः जीव पणाला लावून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. सलग वीस दिवस ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कर्तव्य बजावून घरी आलेल्या राजश्री कानडे यांचे सोसायटीतील नागरिकांनी थाळी वाजवून आणि पुष्पवर्षाव करून स्वागत केले.
पुण्यात सध्या कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण ससून रुग्णालयात आहेत. याच रुग्णालयात उपचार सुरू असताना 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका अक्षरशः जीवपणाला लावून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची काही दिवस केल्यानंतर येथील परिचारिका आणि डॉक्टरांना काही दिवस क्वारंटाईन केले जाते. राजश्री कानडे यांनी काही दिवस कोरोना वॉर्डमध्ये काम केल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता त्या 20 दिवसांनी घरी परतल्या आहेत.
त्या राहत असलेल्या भोसरीतील ट्रीनिटी सोसायटीच्या नागरिकांनी थाळीनाद आणि पुष्पवर्षाव करत त्यांचे स्वागत केले. आपल्या शेजाऱ्यांचे हे प्रेम पाहून राजश्री कानडे यांना अश्रू अनावर झाले. हे सर्व झाल्यानंतर राजश्री कानडे आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत.