पुणे- शहरात मार्च ते ऑक्टोबर मध्यापर्यंत तब्बल ७२० टन कोविड कचरा जमा झाला होता. त्याची वेळोवेळी विल्हेवाट लावण्याचे मोठ्या जिकिरीचे काम प्रशासनाने केले आहे.
जैव वैद्यकीय कचरा ही मोठी समस्या आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. यात हयगय झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने प्रशासनाकडून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार काम सुरू आहे. त्या अंतर्गत होम क्वारंटाईन आणि आयसोलेशन सेंटरमध्ये निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोविड जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुण्यातील पास्को एन्व्हायरोमेंट सोल्युशन प्रा.लि या कंपनीला काम देण्यात आले होते. या कंपनीची प्रतिदिन २ हजार ७०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता होती. मात्र, शहरात मे दरम्यान साधारण २ हजार २०० ते २ हजार ४०० किलो कचरा निर्माण होत होता. तो वाढून ५ हजार किलो प्रतिदिवस पर्यंत गेला. त्यामुळे, अतिरिक्त कचरा हा बारामती येथील जय भवानी बायोमेडिकेअर सिस्टीम या कंपनीकडे पाठवला गेला.