पुणे Yerwada Central Jail : जग हे बंदिशाळा. शब्दप्रभू दिवंगत ग दि माडगूळकरांनी जगाचं वास्तव चित्र उभं करताना योजलेले हे शब्द. जगाला बंदिशाळेची म्हणजे तुरुंगाची उपमा देताना गदिमांना नेमकं काय वाटलं असेल, हे सांगणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं काम आहे. पण बंदिशाळा म्हणजे तुरुंग, हे मात्र प्रत्येकाला चांगलंच ठाऊक आहे. गदिमांचेच शब्द उसने घ्यायचे तर, इथे जो येतो कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. कारागृह ही अशाच पथ चुकलेल्यांची, अट्टल गुन्हेगारांची शिक्षा भोगण्याची जागा, हे तुमच्या-आमच्या मनातलं गृहितक दूर करण्याचा चंग पुण्यातल्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी बांधला आहे. अगदी हत्येसारखा गंभीर गुन्हा हातून घडल्यानंतर आता आपल्या आयुष्यात काहीही चांगलं घडणं अशक्य असं मानणाऱ्या लौकिकार्थाने गुन्हेगाराला कारागृहात का होईना पण आनंदानं जगण्याचं कारण मिळालं आहे.
पदार्थ खाण्यासाठी मोठी गर्दी: कारागृह म्हटलं की, कैदी, बंदी तसंच विविध गुन्हे केलेले अट्टल गुन्हेगार आलेच. त्यातही येरवडा कारागृह (Yerwada Central Jail) म्हटल की, त्यात तर अनेक प्रकारचे कैदी हे शिक्षा भोगत असतात. पण असं असलं तरी ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, अश्या बंदिंसाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. अश्यातच 9 ऑगस्ट रोजी याच येरवडा कारागृहातील बंदी जणांनी सुरू केलेल्या 'श्रृंखला उपहारगृह' पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या बंदी जणांनी बनविलेले पदार्थ खाण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायास मिळत आहे.
अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते नाष्टा सेंटरचे उद्घाटन : 8 ऑगस्ट क्रांतिकारक दिवसानिमित्त पुण्यातील येरवडा कारागृहमार्फत कॉमरझोन आयटी पार्क शेजारी येरवडा पुणे या ठिकाणी, येरवडा खुले कारागृहातील बंद्यांमार्फत चालविण्यात येणारे श्रृंखला उपहारगृह पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटरचे उद्घाटन, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि येरवडा खुले कारागृहाचे अधिक्षक अनिल खामकर उपस्थित होते.
नागरिकांची वाढली गर्दी: येरवडा कारागृहातील बंदी बांधव असो किंवा अधिकारी-कर्मचारी असो, यांच्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेवून विविध उपक्रम अंमलात आणले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बंद्यांसाठी स्मार्टकार्ड योजना, बंद्यांच्या राज्यस्तरीय अभंग स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम राबवले आहेत. तसंच येरवडा खुले कारागृहातील बंद्यांमार्फत चालविण्यात येणारे श्रृंखला उपहारगृह पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटर हे देखील यातील विशेष बाब आहे. या चार महिन्यात या उपहारगृहाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांची नाष्टा, जेवण करण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.