महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरूर लोकसभा : संघाच्या मध्यस्थीनंतर अखेर भाजप आढळराव-पाटलांच्या प्रचारात सक्रिय

शिरूर लोकसभेचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटलांना तीनवेळा निवडून आणण्यात खेड तालुका आघाडीवर राहिला आहे. मात्र, यावेळी खेड तालुक्यात गेल्या ४ वर्षात सेना-भाजपत कधीच जुळले नाही.

By

Published : Apr 6, 2019, 11:41 PM IST

संपादित छायाचित्र

पुणे - शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपशी जुळवून घेण्यासाठी सेनेच्या खेड तालुक्यातील स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना यश मिळत नव्हते. मात्र, आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच मध्यस्थी करून पुढाकार घेतला आहे.

शिरूर लोकसभेचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटलांना तीनवेळा निवडून आणण्यात खेड तालुका आघाडीवर राहिला आहे. मात्र, यावेळी खेड तालुक्यात गेल्या ४ वर्षात सेना-भाजपत कधीच जुळले नाही. तरीही भाजपने या लोकसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा, शिरुर विधानसभा, भोसरी विधानसभा, आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषद, जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत, असे एक वेगळे स्थान निर्माण करून बुथ रचना पूर्ण केली आहे.

हडपसर, भोसरी, शिरुर विधानसभांच्या आमदारांचे काही दिवसांपूर्वी आढळराव पाटलांबरोबर मनोमिल होऊन कामाला सुरुवात झाली. मात्र, खेड तालुक्यात मनोमिलन होत नसल्याने आज तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि जिल्हा परिषद भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांचे संघाच्या मध्यस्थीने अखेर मनोमिलन होऊन ते आढळरावांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यात भाजप निर्णायक वळण देणार आहे.

भाजपची ही ताकद ओळखूनच आढळरावांनी विविध प्रकारे भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खेड तालुक्यात आढळराव यांनी प्रचार दौरे करूनही ते भाजप प्रचारात सहभागी नव्हते. जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत सेना-भाजपमध्ये मोठा संघर्ष खेड तालुक्यात पाहायला मिळाला होता. एकमेकांविरूद्ध टोकांची भुमिका दोन्ही बाजूने घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा संघर्ष टोकाला गेल्याने आता थेट संघानेच पुढाकार घेतला असून देशमुख आणि बुट्टेपाटील यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्यस्थीने मनोमिलन करण्यात आले.

मोदींना पंतप्रधान पदावर पाठविण्यासाठी संघाची सध्या चाललेली ही धडपड शिवसेनेच्या आढळराव पाटलांना विजय मिळवून देईल का? हे पुढील काळात पाहावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details