पुणे :आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सहा हजार झाडांची कत्तल करण्यात येत असेल तर हे निश्चितच पुणेकरांच्या दृष्टीने चांगले चिन्ह नाही. जी झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे ती देशी झाडे असून त्यावर अनेक पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध आहे. शहराचा विकास व्हायला हवा आणि पर्यावरणाचे रक्षणही व्हावे, या मागणीकरिता प्रशासनास आणि भाजपच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाग यावी याकरिता पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत, असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
विकासाच्या नावाखाली झाडांच्या कत्तली :यावेळी उद्यान विभागाच्या बाहेर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडावर चढून देखील आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात भाजपकडून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापायी नदी सुधार योजना राबविली जात आहे. पुण्यातील नदी क्षेत्र कमी करण्याचे काम भाजपचे लोक करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत नाही. पण, विकासाच्या नावाखाली झाडांच्या कत्तल होत आहेत, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही या विरोधात हरित लवादाकडे जाणार असल्याचे यावेळी प्रशांत जगताप म्हणाले.