पुणे - व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या सहा जणांना वन विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून 3 किलो व्हेल माशाच्या उलटी सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 28 ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली.
मुहमदनईन मुटमतअली चौधरी (वय 58 वर्षे), योगेश्वर सुधाकर साखरे (वय 25 वर्षे), अनिल दिलीप कामठे (वय 45 वर्षे), ज्योतिबा गोविंद जाधव (वय 38 वर्षे), कृष्णात श्रीपती खोत (वय 59 वर्षे) आणि सुजाता तानाजी जाधव (वय 44) अशी रंगेहाथ पकडलेल्या सहा जणांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी तिघेजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला होता. त्यानुसार शनिवारी पिंपरी चिंचवड येथील पूर्णा नगर याठिकाणी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या वरील सर्व आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून साधारण तीन किलोग्राम व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ आणि चारचाकी गाडी जप्त केली.