पुणे - येथे येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसला दररोज उशीर होत असल्याने आज लोणावळा रेल्वे स्थानकात संतापलेल्या रेल्वे प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घालत जाब विचारला आहे. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.
'सिंहगड एक्सप्रेस'ला दररोज उशीर होत असल्याने रेल्वे अधिकाऱ्याला घातला घेराव
येथे येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसला दररोज उशीर होत असल्याने आज लोणावळा रेल्वे स्थानकात संतापलेल्या रेल्वे प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घालत जाब विचारला आहे.
सिंहगड एक्सप्रेस ही मुंबईमध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी महत्वाची मानली जाते. पुण्यातून सिंहगड एक्सप्रेस ही वेळेत निघते. तसेच सर्व स्थानके करून लोणावळा येथे वेळेत पोहचते, मात्र, मार्गामध्ये मालगाडीला प्राधान्य दिल्याने ही एक्सप्रेस अर्धा तास उशिराने लोणावळ्याला पोहोचते. म्हणून परिसरातील नोकरदार वर्ग हा वेळेत नोकरीवर पोहचू शकत नाही, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
मालगाडीला जाण्याचा मार्ग देण्यासाठी एक्सप्रेस लोणावळा स्थानकात थांबविली जाते. म्हणून तिला बाजूला थांबवून ठेवावे. असे म्हणत संतापलेल्या रेल्वे प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आणि खडे बोल सुनावले. ही समस्या एका दिवसाची नसून आम्हाला दररोज याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात प्रशासनास जाब विचारल्याचा परिणाम होईल व सिंहगड एक्सप्रेस वेळेत सुटते की नाही हे बघावे लागेल, असेही प्रवाशांनी सांगितले.