पुणे - कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने भाजपच्या नगरसेविकेने येथे चक्क शोले स्टाईल आंदोलन करत आपला निषेध नोंदवला आहे. सुजाता पालांडे असे नगरसेविकेचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अशा वेळी एका भाजपच्याच नगरसेविकेला आंदोलन करण्याची वेळ आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
भाजप नगरसेविकेचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन
कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पुणे शहरातील भाजपच्या नगरसेविकेने चक्क शोले स्टाईल आंदोलन करत आपला निषेध नोंदवला आहे. सुजाता पालांडे असे नगरसेविकेचे नाव आहे.
नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या प्रभाग क्रमांक २०, संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेल्या सहा दिवसांपासून पाणी आलेले नाही तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंबंधित तक्रार नागरिकांनी त्यांच्याकडे केली होती. पालांडे यांनी जबाबदारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मात्र, यानंतरही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच काल सोमवारी पालांडे यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन तीन तास शोले स्टाईल आंदोलन केले आहे. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेविका पालांडे यांनी आंदोलन मागे घेतले.