महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी औरंगाबादचा शिवसैनिक सरसावला, ५ लाखांच्या औषधांची मदत

कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी औरंगाबादच्या एका शिवसैनिकाने दहीहंडीसाठी जमा केलेली रक्कम पाठवली आहे. बाळासाहेब थोरात असे त्या शिवसैनिकाचे नाव आहे.

पूरग्रस्तांसाठी ५ लाखांच्या औषधांची मदत

By

Published : Aug 21, 2019, 10:14 PM IST

औरंगाबाद -कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी औरंगाबादच्या एका शिवसैनिकाने दहीहंडीसाठी जमा केलेली रक्कम पाठवली आहे. बाळासाहेब थोरात असे त्या शिवसैनिकाचे नाव आहे. त्यांनी ५ लाखांची औषधे आणि ५१ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून पाठवली आहे.

सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. इतकंच नाही तर पूर सरला असला तरी त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. अनेक लोकांना विविध आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजारांवर उपचार देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी ५ लाखांची औषधी पाठवली आहेत. त्यामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, त्वचा रोग यासह हृदयरोग या औषधींचा समावेश आहे.

पूरग्रस्तांसाठी ५ लाखांच्या औषधांची मदत

औरंगाबादच्या टीव्ही सेंटर परिसरात दरवर्षी धर्मरक्षक दहीहंडीचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्या दहीहंडीचं स्वरूप हे थोडं लहान करण्यात आले आहे. कारण दहीहंडीसाठी जमलेल्या निधीतून बराचसा निधी हा पूरग्रस्तांना पाठवण्यात आला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये वैद्यकीय सेवा देखील कोलमडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आवश्यक असणारी औषधे लवकर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच दहीहंडीचे आयोजक बाळासाहेब थोरात यांनी ५ लाखांची औषधे मदत म्हणून पूरग्रस्त भागात पाठवली आहेत. तर जमा झालेल्या पैशातून ५१ हजारांची मदत देखील पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली आहे.

औषधांनी भरलेला ट्रक औरंगाबाद येथून मुंबईला शिवसेना भवन येथे दाखल होणार आहे. तिथे वैद्यकीय टीम या औषधांची तपासणी करून गरजू लोकांना ती पाठवण्यात येणार आहे. या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळेल. दहीहंडी दरवर्षी होत असते, मात्र यावेळेस खरी गरज पूरग्रस्तांना आहे. त्यामुळे दहीहंडी साजरी करत असताना पूरग्रस्तांना मदत आम्ही पाठवत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details