पुणे -राज्यात पुढीलवर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने एकत्र येत निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली आहे. पुण्यात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास शिवसेना 80 जागा लढवणार आहे. तसेच यंदा पुण्यात शिवसेना किंग किंवा किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचे अस मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात शिवसेना भवन येथे आयोजित शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'शरद पवार यांच्यावर टीका करण्याची फॅशन आहे'
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची आजकल फॅशन झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आजकाल शरद पवार यांच्यावर कोणीही टीका करत आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धीच मिळत नाही म्हणून विरोधक आज शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले.