पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आपल्याकडे नाही. तीन विधानसभांची तयारी आता पासून करायला हवी. आघाडी की महाविकास आघाडी हे नंतर बघू. मात्र, आपली तयारी पाहिजे. निवडणूका होतील तेव्हा होतील त्यात आपण जिंकूच. मात्र, पाडण्याची ताकद पाहिजे. पुढे ते म्हणाले की, पाडापाडीमुळे नुकसान होते. जेव्हा आपल्यात पाडण्याची ताकद निर्माण होईल. 'मी तुला पाडल हं....इथं जर शहाणपणा केलास तर तिकडे पाडणार', ही प्रत्येक मतदार संघामध्ये दहशत निर्माण केली पाहिजे. ही दहशत आपण संघटनेच्या बळावर करू शकतो, अस राऊत म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
लाज वाटली पाहिजे -
पुढे ते म्हणाले, चिंचवड भागात पाच किंवा सहा नगरसेवक असण ही चांगले लक्षण नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे. अनेक वर्षे यासंदर्भात आपण विचार करत आहोत. 14 नगरसेवक होते. त्याचे नऊ झाले. नऊचे 90 होतील हे मला माहित नाही. 50 तरी व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकारी आणि खासदारांकडे केली. पिंपरी-चिंचवडला शिवसेनेचा महापौर पाहिजे. हे स्वप्न आपण पाहिले पाहिजे. कोणीही ऐरागैरा महापौर होत आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.