पुणे : महाराष्ट्रीय मंडळातर्फे देण्यात येणारा कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना जाहीर झालाय. क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
'इथेनॉल मॅन'च्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार : येत्या रविवारी (३ सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता, महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे पुरस्कार सोहळा होणाराय. ज्येष्ठ उद्योजक, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष व भारताचे इथेनॉल मॅन अशी ओळख असलेले डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाह रोहन दामले यांनी ही माहिती दिली.
पुरस्काराचे स्वरुप काय : यंदा या पुरस्काराचे २६ वे वर्ष असून, २५ हजार रोख रुपये, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, क्रीडा प्रशिक्षक गुरबंस कौर, भीष्मराज बाम, ग्रँड मास्टर अभिजित कुंटे हे या प्रतिष्ठित पुरस्काराचे आधीचे मानकरी आहेत.
चंदू बोर्डे यांचा परिचय : चंद्रकांत गुलाबराव उर्फ चंदू बोर्डे यांचा जन्म २१ जुलै १९३४ रोजी पुण्यात झाला. १९५८ ते १९७० दरम्यान ते भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. ते राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००३ मध्ये त्यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळाला. हा बीसीसीआयद्वारे माजी खेळाडूला दिला जाणार सर्वोच्च सन्मान आहे.
शिवरामपंत दामले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होते : कॅप्टन शिवरामपंत दामले हे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी पुण्यात मराठी शिक्षणासाठी अनेक शाळांची स्थापना केलीय. यासोबतच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी देखील कार्य केलंय. शिवरामपंत दामले यांनी १९२४ मध्ये महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे दरवर्षी 'कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार' दिला जातो.
हेही वाचा :
- Dhyan Chand : अनवाणी पायानं खेळणाऱ्या ध्यानचंद यांना पाहून हिटलरंनं दिली होती 'ही'ऑफर! जाणून घ्या
- National Sports Day 2023 :29 ऑगस्टला का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व...
- Yo Yo Test : ना हार्दिक, ना विराट; टीम इंडियाच्या यो-यो टेस्ट मध्ये 'हा' खेळाडू अव्वल