पुणे :आज देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरा होत आहे. सकाळ पासूनच पुण्यातील विविध शिव मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. असे असले तरी अनेक शिव भक्तांकडून महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर येथील काळेपडळ येथे राहणाऱ्या दिपक घोलप या तरुणाने चक्क 79307 रुपये किंमतीचे 22 हजार 301 नाणे वापरून शिवलिंग बनविले आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद :दिपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविले आहे. २२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला असून गेल्यावर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातील हा अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा या तरूणाने केला आहे.
नाण्यांपासून शिवलिंग :दिपकने या शिवलिंगासाठी 14 हजार 916 पाच रुपयांची नाणी, 4 हजार 875 दहा रुपयांची नाणी, 2 हजार 510 एक रुपयाची नाणे असे मिळून एकूण 79 हजार 307 रुपयांची हे शिवलिंग बनविण्यात आले आहे. माझी मोबाईल शॉपी आहे. कामा व्यतिरिक्त मी इतर कोणताही छंद जोपासलेला नाही. मी शिवाचा भक्त असल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी म्हणून दररोज शिवालयात जातो. जगात कुणीही संकल्पना राबवली नसेल, असे शिवलिंग बनविण्याचा माझा मानस होता. नाण्यांपासून अशी चांगली कलाकृती होईल असा विचार करून चार महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग बनविता आले आहे. असे यावेळी दिपक घोलप याने सांगितले.
चार महिने परिश्रम :दिपक हा शिवभक्त आहे. तो दररोज नित्यनियमाने शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. शिवलिंग प्रतिमा त्याला कायम मोहीत करते. आपण काहीतरी वेगळं करावे या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना सुचली. त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग बनविले आहे. गेल्या वर्षभरापासून परिसरात या शिवलिंगाची चर्चा सुरू आहे.
महाशिवरात्रसर्वोच्च मुहूर्त :भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अत्यंत सर्वोच्च मुहूर्त म्हणजे महाशिवरात्र होय. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागून सर्वांनी भगवान शंकरांची आराधना करावी. अकाल मृत्यू, अपमृत्यू आदी सर्वांवरती विजय मिळावा. आपले जीवन परिपूर्ण व्हावं, दीर्घायुष्य मिळावे यासाठी भगवान शंकरांची पूजा करावी. घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर विधीवत ठेऊन पूजा मांडावी. पिंड किंवा प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड मांडून पूजा करावी. पहाटे स्नान करून पूजा करावी. या पूजेला देवाला अभ्यंगस्नान घालावे. पांढरी फुले, बेल व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृतानी स्नान घालावे. ऊॅं नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. शिवपूजेत हळद-कुंकू न वापरता भस्म वापरावा, तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी.
हेही वाचा :Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला भांग गांजाची नशा करणे चुकीचे- महंत अनिकेत शास्त्री महाराज