पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक अर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आले असून आणखी 81 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार तब्बल 153 कोटी 50 लाखांपर्यंत गेला आहे. तर आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
भोसले बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले या चौघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. तर याप्रकरणी एकूण 16 आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने तक्रारदारांना कंपनीला बॅंकेच्या रोख व शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. यावेळी बॅंकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले होते.