पुणे (शिरूर) -चोऱ्या करायच्या तुम्ही, लोकांना फसवायचे, लुटायचे, खंडणी गोळा करायची तुम्ही, दंगलही घडवायची तुम्हीच आणि प्रकरणे अंगाशी आली, की त्या प्रकरणामागे आढळरावांचा हात आहे, असा कांगावा करायचा. असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि मंगलदास बांदल हे दोघेही पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. ते शिरूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिलीप मोहिते, मंगलदास बांदल गुन्हेगारी वृत्तीचे, अनेकांचे संसार केले उद्धवस्त; आढळराव पाटलांचा आरोप शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांना ग्रहण लागले असताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटिल यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. दिलीप मोहिते आणि मंगलदास बांदल या दोघांचाही गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास पाहिला, तर या दोघांनी अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत आणि स्वतः केलेले पाप माझ्या अंगावर टाकत आहेत.
माझी पंधरा वर्षांची कारकिर्द पाहा आणि या दोघांची कारकिर्द पाहा. कुठून आला ऐवढा पैसा, कुठून आला ऐवढा रुबाब, कशाच्या जीवावर करताय ही दादागिरी. पैशाच्या जीवावर चाललेली ही दादागिरी आज अनेकांच्या जीवावर येत आहे. कुठून आला यांच्याकडे हा पैसा, असे अनेक प्रश्न आढळराव पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते आणि मंगलदास बांदल यांनी स्वतःच्या अंगावर येत असलेले संकटाचे खापर दुसऱ्याच्या अंगावर फोडण्याचे काम करू नये. दिलीप मोहिते चाकण येथील मराठा आंदोलनातील दंगलीप्रकरणी मुख्यसुत्रधार असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर मंगलदास बांदल यांच्यावर शिरूर तालुक्यात जमीन फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी, आपल्यावरील कारवाईमागे आढळरावपाटील असल्याचा आरोप केला होता.