पुणे - मी जातीपातीचे राजकारण मानत नाही. माझ्या १५ वर्षांच्या कार्यकाळात कोणाचीही जात काढली नाही. आजवर जातीचे राजकारण करण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे, अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले, मी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकर ठाकरे, बाळासाबाहेब ठाकरे यांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी जातीचे राजकारण कधीच केले नाही. जातीपातीच्या राजकारणापासून मी दूर आहे. माझ्या दृष्टीने सर्व जातीपाती समान आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भाजप आणि शिवसेनेत आता कुठलेही मतभेद राहिले नाहीत. भाजपचे नेते योगेश टिळेकर, बाबुराव पाचर्णे आणि महेश लांडगे या तिघांमध्ये स्पर्धा आहे की, सर्वात जास्त लीड कोण देईल? मोठ्या उत्साहाने संबंधितांनी त्या त्या मतदार संघाची जबाबदारी घेतली आहे. मागचे सगळे काही विसरून युतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. असे आढळराव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचे नमूद करताना आढळराव म्हणाले, माझ्या तिन्ही निवडणुका मी चढत्या मताधिक्क्याने जिंकलो आहे. पहिल्या वेळेस २० हजार मताधिक्य होते. दुसऱ्या वेळेस १ लाख ८० हजारांचे मताधिक्य होते, तिसऱ्या निवडणुकीत ३ लाख ३ हजारांचे मताधिक्य होते आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीत चार ते पाच लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येईन, असा विश्वास आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.