पुणे - पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, बैलगाडा शर्यत बंदी या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप असून त्याचे खापर माझ्यावर फोडले जाते आहे. मात्र, हा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा स्मृतिभ्रंश झाला असल्याची टीका शिरूर मतदारसंघातील युतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी केली आहे.
बैलगाडा शर्यतबंदी हे तर राष्ट्रवादीचेच पाप, डॉ. कोल्हेंचा स्मृतिभ्रंश झालाय - आढळराव आढळराव म्हणाले, कोल्हे हे गेल्या चार वर्षापासून माझ्याबरोबर काम करत होते. त्यावेळी म्हणत होते भारतातील सर्वोत्कृष्ट खासदारांमध्ये शिवाजी आढळराव-पाटील आहे. मग इतिहासावर काम करणाऱ्यांना मागील गोष्टींचा विसर पडला असून त्यांचा स्मृतिभ्रंश झालेला दिसतोय, ते खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे प्रचारसभेत बोलत होते.
बैलगाडा शर्यतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना बंदी आली. ही बंदी उठविण्यासाठी मी व बैलगाडा मालकांनी मोठा संघर्ष उभारला. त्याचवेळी तमिळनाडू राज्यात जल्लिकट्टु सुरू होण्यासाठी तेथील सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले उपोषणाला बसले, त्यावेळी बैलगाडा मालक असणारे डॉ. अमोल कोल्हे काय करत होते. त्यावेळी त्यांच्या बैलगाड्यावर बंदी नव्हती का.? तेव्हा अभिनेता आंदोलनात का नाही आला, का नाही बैलगाडा शर्यतबंदीचा जाब का विचारला नाही, असा सवाल आढळरावांनी केला. तसेच नुसतं नावापुरतं छत्रपती संभाजी मालिकेत काम करुन मत मागणार असाल तर ते चालणार नसल्याचेही वक्तव्य आढळरावांनी केले.
शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळरावपाटील यांनी अर्ज भरल्यानंतर खेड तालुक्यात प्रचार दौरा केला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे ऐकेकाळी सहकारी असणारेच आता एकमेकांच्या विरोधात शाब्दिक फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत.