पिंपरी-चिंचवड (पुणे) -पालकमंत्री हे ऐकत नाहीत असे काही जण म्हणाले आहेत. महाराष्ट्रात सत्ता आपली असली तरी पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये कोणी ऐकत नाही, असे कसे होईल? असे होता कामा नये. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. अजित पवार हे देखील मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. त्यांना सांगू ऐकले तर बरे होईल. नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत, असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यानंतर लगेचच राऊतांनी पत्रकारांना हा गमतीचा भाग असून ते छापू नये, अशी सारवासारव केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.
'...म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत'
संजय राऊत म्हणाले, की 55 ला आमचा मुख्यमंत्री होतो. तर 40-45 ला पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे. आमच्या अपेक्षा माफक आहेत. महाआघाडी आहे. सर्वांना थोडे थोडे मिळाले पाहिजे. पिंपरी-चिंचवडचा महापौर व्हावा ही अपेक्षा ठेवली तर चुकले काय? पुण्याचा महापौर व्हावा अशी अपेक्षा असेल तर चुकलं काय? इतकी वर्षे झाले महाराष्ट्राच्या राजकारणात आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातील आहे. ते नेहमी या भागात येत होते. अनेक सभा त्यांनी घेतल्या अनेक माणसे जोडली. पण या दोन्ही शहरात भगवा झेंडा फडकू शकला नाही. ही खंत आपल्या सर्वांच्या मनात आहे, असेही यावेळी राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या दिल्लीवर राज्य करायचे आहे. पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्री कुठे बसतात हे पाहायचे आहे. उद्या तिथे टप्प्या टप्प्याने पोहोचायचे आहे. सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत, असे राऊत म्हणाले. आपण सर्व जण एकदा अजित पवार यांच्याशी बसून बोलू. आपल्याला एकत्र काम करायचे आहे. आमच्या लोकांचे अधून मधून ऐकत जा. आमच्या लोकांना नाराज करू नका, अन्यथा गडबड होईल, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
हेही वाचा -...म्हणून किरीट सोमैया आता कोल्हापूरमध्ये येऊ शकतात - सतेज पाटील