पुणे - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यात मराठा समाजाकडून वेगवेगळ्या प्रकारे याचा विरोध केला जात आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे येत्या 3 ऑक्टोबर रोजी विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मराठा समाजातील 100 ते 150 विचारवंत या बैठकीत सहभागी होतील. यामध्ये वकील, माजी न्यायाधीश, निवृत्त अधिकारी इत्यादींचा समावेश असेल. या बैठकीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात जी काही भूमिका ठरेल, तीच शिवसंग्राम पक्षाची अंतिम भूमिका असेल, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण देण्याविषयी चर्चा सुरू असतानाच ओबीसी समाजातील मंडळींकडून विविध स्वरुपाची विधाने केली जात आहेत. त्यातून सामाजिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री'च्या बाहेर येत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरक्षणाचे परिणाम, दुष्परिणाम कळणार नाहीत. त्यांनी काही लोकांना एकत्र आणून बैठक घ्यावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र, ते याबाबत काही करत नाहीत. त्यामुळेच आमच्यावर अन्याय होत आहे.