बारामती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान रोजंदारी व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विचार करता, बारामतीत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील शेकडो कुटुंबीयांना अल्पदरात भोजन मिळत असल्याने गरजू नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून गरजूसांठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी, पुण्यापाठोपाठ आता बारामतीत ही सुरू करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प असल्याने रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. अशा गरजू कुटुंबीयांसाठी बारामतीतील रयत भवन येथे केवळ पाच रुपयात १२ ते ३ यावेळेत शिवभोजन थाळीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी गरजूंनी ओळख म्हणून आधारकार्ड किंवा मतदान कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.