शिरूर (पुणे)- सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे शिरुर तालुक्यात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात येत आहेत. मागील वर्षी वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनात घट झाली होती. उत्पादित झालेला आंबा टाळेबंदीमुळे विक्री झाला नव्हता. त्यामुळे आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे कडाक्याची थंडीने आंब्याच्या मोहरला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी गीताराम कदम सांगतात.
आंब्याचा मोहोर टिकण्यासाठी मधमाशांचे काम महत्त्वाचे-
आंब्याला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून बहर लागला आहे. सध्याचे वातावरण आम्रमोहर टिकण्यासाठी पोषक आहे. यादरम्यान झाडांना पाणी व वातावरणातील बदलानुसार फवारणी करण्याची गरज आहे. आंब्याला आलेला मोहोर टिकवण्यासाठी मधमाशा महत्त्वाचे काम करत असतात. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा बागेत मधुमक्षिका पालन करावे, त्यामुळे आंब्याला आलेला भर टिकून राहतो. तसेच रोगराई पसरत नसल्याचे शेतकरी कदम यांनी सांगितले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याने आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.