शिरूर/पुणे Shirur Drugs Case :सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरणं चांगलंच गाजतंय. या प्रकरणासंबंधित मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचं बोललं जात असताना आता शिरुर तालुक्यातील छोट्याशा मिडगुलवाडी गावात नार्कोटिक्स विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत तब्बल १७४ किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. दरम्यान, नार्कोटिक्स विभागाने ही कंपनी सील केली असून या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
१७४ किलो ड्रग्ज जप्त :मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं शिक्रापूर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. ही कारवाई इतकी गोपनीय होती की यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तीस तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती. या कारवाईनं पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आलंय. तसंच या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचं फिनेल हे केमिकल बनवलं जात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. शेड व कंपनी अतिशय जंगलात असल्यानं कोणालाही याची माहिती नव्हती. नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय.