पुणे: पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आज (रविवारी) जिल्ह्यातील पालखी विसावा आणि मुक्कामाच्या स्थळांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला आहे.
भाविकांच्या सुविधांची पाहणी:संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहेत. यावर्षी असलेली उन्हाची तीव्रता पाहता त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेकडून तयारीची पाहणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात नीरा येथे पालखीचा मुक्काम असतो. तेथेसुद्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी एक इमारत घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा देण्यात आलेल्या आहेत.
निवारा केंद्राची उभारणी: पालखीचे टप्पे हे ठरलेले असतात. परंतु, यावर्षी पालखी मार्गात लागणारे ऊन लक्षात घेता, तीन ते चार किलोमीटरवर निवारा केंद्र उभारण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. त्याची तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचाच आढावा जिल्हा परिषदेचे अधिकारी घेत आहेत. जिथे जिथे पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणच्या तयारीची पाहणी केली जात आहे.