बारामती :मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेते समजले जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील हे पवारांसोबत होते. परंतु मध्यंतरीच्या काळात ते पक्षापासून दुरावले गेले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. रविवारी त्यांनी पवारांसोबत कृषिक प्रदर्शनाची पाहणी केली. यासंबंधी पवार म्हणाले, विजयदादा यांना कृषि क्षेत्राबद्दल आस्था आहे. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे.
तरुणाई हे शेतीचे भविष्य :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना पवार म्हणाले की,शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली. तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे. आणि शेतीतील नवीन शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत. हीच बाब अत्यंत महत्वाची आहे. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शेतीमध्ये अमुलाग्र बदल : पवार म्हणाले, या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे. मागील पंधरा वर्षात जी शेती विषयक धोरणे झाली त्यातून अन्नधान्याचे उत्पादन वाढले आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. 252 दशलक्षणावरून आज 300 दशलक्षणाच्या पुढे गेलेले अन्नधान्याचा साठा हे हेच दर्शवते की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले. त्यांनाही हे नवे तंत्रज्ञान खुणावत आहे. 80 टक्के तरुणांची या प्रदर्शनामधील संख्या पाहून मला अतिशय आनंद वाटला.