पुणे Sharad Pawar VS Ajit Pawar :राष्ट्रवादीतील फूटीनंतरही यंदाची दिवाळी आम्ही एकत्र साजरी करू, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आजारपणानं आणखी काही दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्रांती घेणार असल्याचं अजित पवार यांच्या कार्यालयानं स्पष्ट केले. त्यामुळे यंदाच्या दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एका व्यासपीठावर येण्याची शक्यता धूसर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'एक्स'वर ट्विट करत आणखी काही दिवस आपण डेंग्यूमुळे सक्तीची विश्रांती घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
गोविंदबागेत दरवर्षी दिवाळी पाडव्याला एकत्र येते पवार कुटुंब :ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय एकत्रितपणानं राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य जनतेला भेटत असते. यंदा राष्ट्रवादीत फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा गट भाजपा-शिवसेनेसोबत गेला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे सातत्यानं कुटुंब म्हणून आम्ही एक असल्याचं सांगत आहेत. यापूर्वीच्या बारामती दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारण वेगळं, कुटुंब वेगळं असल्याचं सांगत यंदाही पवार कुटुंबीय दिवाळी एकत्र साजरी करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेल्या पत्रामुळे ही शक्यता धूसर झाली आहे.
- शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा :भिगवण इथं मागील पंधरवड्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबीय एका व्यासपीठावर आलं होतं. मात्र या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणतंही बोलणं झालं नाही. या कार्यक्रमात काका पुतण्यातील दूरावा दिसून आला होता.