पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीबाबत आपले मतभेद असतील. मात्र, आरएसएसचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने लोकांना भेटण्याचे संपर्क अभियान राबवतात, तशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहचा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्ववभूमीवर भोसरी येथे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभेतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी पवार बोलत होते.
आत्तापासूनच घरोघरी जाऊन लोकांना भेटायला हवे. हे काम केले तर, ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत. आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. संध्याकाळी घर बंद असेल तर सकाळी त्या घरी जाऊनच येतात, असे सांगत आरएसएसकडून चिकाटी शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.