पुणे :नवीन पिढीला तयार करताना तंत्रज्ञाच्या आधाराची गरज असून त्यामुळे देशाच्या विकासासाठी ते विविध संशोधन करून विकास करतील. या साठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आजच्या तरुणाईला यश मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.
आजच्या तरूणांना यश : ते पुढे म्हणाले की, स्टार्टअप व अन्य योजनांमुळे ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी होणार आहे. परंतु तरुणांनी यासाठी जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. संशोधन व तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल, अशी अपेक्षा यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.
उद्घाटन व लोगोचे अनावरण : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे आणि एस एम ई चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पर्वती येथील शाहू कॉलेजच्या आवारातील डीएसटी प्रयास शाळा व रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण शरद पवार यांचे हस्ते आज झाले.