पुणे - देशामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. त्यांच्या नावानेच त्यांचे राज्य ओळखले जाते. मात्र, शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचे राज्य म्हणून नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याच्या नामकरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सचिन धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. धर्माधिकारी कुटुंबाचे काम मोठे आहे. त्यांना कधी जाहिरात करायची गरज भासली नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्ही पवार साहेबांबरोबर आमच्या कामाचा प्रचार करण्यासंदर्भात चर्चा करतो. मात्र, त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण चांगल्या कामाला प्रसिद्धीची गरज नसते. जे काम करत नाहीत त्यांना प्रसिद्धीची गरज असते, म्हणूनच तर भाजप सरकार जाहिराती करतात, अशी टीका यावेळी त्यांनी केली.