पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळमध्ये बोलताना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वत: विचार करण्याची गरज आहे', असे शरद पवार म्हणाले.
'मी शिखर बँकेचा कधीच मेंबर नव्हतो' :शरद पवार म्हणाले की, मोदींनी उल्लेख केलेल्या शिखर बँकेचा मी कधीच मेंबर नव्हतो. मी त्या बँकेचे लोन देखील कधीच घेतले नव्हते. तसेच मी कधीच त्या संस्थेचा सदस्य नव्हतो. मात्र तरीही असे आरोप करणे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच पंतप्रधानांनी सिंचनाच्या बाबतीत जे वक्तव्य केलं, ते खरं नसल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.
मोदींंची पवार कुटुंबीयांवर टीका : पवार कुटुंबीयांवर टीका करताना मोदी म्हणाले होते की, 'सुप्रिया सुळे यांचे भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या'. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्याचे कारण नाही. त्यांचा याच्याशी संबंध नाही. परंतु देशातील विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतात आणि देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा यावर अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे शरद पवार म्हणाले.
'भगीरथ भालकेंची निवड चुकली होती' : राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेत संधी दिली त्यानंतरच आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती. त्यांच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.
हे ही वाचा :
- Narendra Modi on Sharad Pawar : 'शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर.... '; मोदींचा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल
- NCP Reply PM Modi Allegation : नरेंद्र मोदींच्या आरोपांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर; म्हणाले, मोदींना जुने दिवस आठवायला...