पुणे Sharad Pawar in Engineer Day Programme : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असून त्यांनी अनेक खात्यांमध्ये कामही केलंय. त्यांनी त्यांच्या आयुष्याबाबत एक किस्सा सांगितला. जेव्हा मी संरक्षण मंत्री झालो तेव्हा मला आर्मीा ड्रेस देखील माहीत नव्हता, तसंच आर्मीमध्ये मेजर म्हणतात की लेफ्टनंट जनरल म्हणतात याबाबतही मला माहिती नव्हती. पण जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा मी एका विद्यार्थ्याप्रमाणे कोल्हापुरातील जनरल थोरात यांच्याकडे जाऊन शिकलो, असं सांगत पवारांनी त्यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या काळातील आपला किस्सा सांगितला. पुण्यातील सिम्बोयासिस महाविद्यालयात राष्ट्रीय अभियंता दिनाच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी हा किस्सा सांगितलाय. या कार्यक्रमासाठी शरद पवारांसह जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे तसंच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मला माणसं जोडायची सवय : यावेळी पवार म्हणाले की, मला माणसं जोडायची सवय आहे. मी लोकांशी बोलत असतो. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जमत नाही त्या क्षेत्रामध्ये आपण विद्यार्थी म्हणून जावं असं माझं मत आहे. मी मुख्यमंत्री, कृषीमंत्री तसंच सरंक्षण मंत्री असताना देखील असंच करत होतो. आपल्याला एखाद्या क्षेत्राचा अभ्यास कमी आहे, म्हणून कमीपणा समजायचं नाही तर ते शिकण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असंही पवार म्हणाले. जेव्हा मला संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली, तेव्हा मला आर्मीबाबत काहीही माहिती नव्हती. तेव्हा मी कोल्हापुरातील जनरल थोरात त्यांच्याकडं जात होतो. संरक्षण मंत्री असूनही मी त्यांच्याकडे एका विद्यार्थ्याप्रमाणे सगळ्या गोष्टी शिकत होतो, असंही पवार यावेळी म्हणाले.